मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

 

 औरंगाबादः : वृत्तसंस्था । गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. इतर बहुजन समाजाताली लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी आमची भूमिका आहे असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांनी जी रचना रचली आहे ती आता महाराष्ट्राला लागू होत नाही का? अशी विचारणाही यावेळी संभाजीराजेंनी राजकीय नेत्यांना केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

जे राज्याच्या हातात आहे ते राज्याने आणि केंद्राने त्यांच्या हातात आहे ते करावं आणि मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढावा अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. “मी कोणत्याही राजकीय नेत्यांना भेटणं टाळलं आहे. समाजाची अस्वस्थता जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. २७ ऐवजी आपण २८ तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं यावेळी त्यांनी जाहीर केलं.

 

“सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. ५८ मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झालं आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या मताचा मी नाही. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. कोरोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल,” असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

 

“सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची असून त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरु नका. इतर बहुजन समाजातील लोकांना कसा न्याय देत आहात? माझ्यासहित जो श्रीमंत वर्ग आहे त्यांना एक टक्काही मदत देऊ नका. पण जो ३० टक्के गरीब समाज आहे त्यासाठी अपवादात्मक मदत कशी करणार ते सांगा,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “”मी जर चंद्रकांत पाटील असतो तर उत्तर दिलं असतं. मी संभाजी छत्रपती असून त्याबद्दल मला विचारा. त्याबद्दल मी भाष्य करतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, ह्रदयात काय मला काय माहिती, मी काही ज्योतिषी नाही. छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांनी केव्हाच ज्योतिषी मानले नाहीत तर आम्ही कसे मानू”.

 

Protected Content