भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड वापरत असलेल्या दोन महागड्या कार अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडात संशयीत बंटी पथरोडचेदेखील नावे असून तो सध्या पसार आहे. संशयीत राहत असलेल्या जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात झायलो व इको वाहन पार्क केल्या होत्या मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. गुरूवार 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रभारी निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली मात्र या संदर्भात कुणाचीही तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.