जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेल्वे मालधक्क्यावर तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा हुडको असे अटकेतील दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत गणेश गायकवाड (वय-२०) रा. राजमालती नगर, जळगाव हा तरूण आई सारीका, वडील गणेश रमेश गायकवाड आणि लहान भाऊ विशाल यांच्यासह वास्तव्याला होता. मंगळवारी २४ मे रोजी रात्रीच्या सुमारास अनिकेत हा काहीही न सांगता घरातून बाहेर गेला होता. दरम्यान, शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील रेल्वेच्या मालधक्का परिसरातच गोडावुन समोर मध्यरात्री उशीरा अनिकेतच्या डोक्यात दगफ टाकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका हमालाने अनिकेतला ओळखले आणि पोलीसांना त्याच्या घराची माहिती दिली. बुधवार २५ मे रोजीच्या मध्यरा २.३० वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील रहिवासी तसेच मालधक्क्यावर हमाली करणारे गणेश रमेश गायकवाड (वय-५०) यांच्यासह कुटूंबीयांनी धाव घेतल्यावर मयत तरुण अनिकेत माझा मुलगा असल्याचे सांगत आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. बुधवार २५ मे रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करुन कुटूंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी हे मेहरूण तलाव परिसरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा हुडको दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता तिघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. अनिकेतचे सागर आणि सुमित सोबत बाचाबाची झाल्याने चाकूने वार करून चेहऱ्यावर दगड टाकून खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.