खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने बसस्थानकासमोर कोळीपेठ येथील तरूणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. इतर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या खूनाच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी मृत तरूणाच्या वडीलांनी सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

जळगाव शहरातील जुने बसस्थानकासमोर जुन्या वादातून आकाश सुरेश सपकाळे (वय-३०) रा.कोळीपेठ, जैनाबाद जळगाव या तरूणाचा गोपाळ उर्फ आण्णा कैलास सैंदाणे याने चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यावेळी आकाशचा भाऊ सागर आणि त्याचा मित्र हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संशयित आरोपीचा मोबाईल आणि दुचाकी अद्याप पोलीसांनी जप्त केलेली नाही. तसेच ही घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्ता क्लबमध्ये संशयित आरोपीचे भागीदारी आहे. त्यामुळे शहर पोलीसांचे लागेबंधे असल्याने संशयित आरोपीला मदत होत असल्याची शक्यता नाकारता येते नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी मागणी मृत आकाश सपकाळे यांचे वडील सुरेश सपकाळे यांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना निवेदन देवून मागणी केली आहे.

Protected Content