अल्पवयीन मुलीच्या अपहरण व हत्याप्रकरणी दोन जणांना अटक

मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालेगाव तालुक्यातील अजंग येथील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गावातील दोघांना अटक केली आहे. संशयित योगेश शिवदास पटाईत हा मुलीच्या शेजारी राहत होता. दोघा कुटुंबात नेहमी वाद होत असल्याने योगेश याने नीलेश ऊर्फ रवी पवार याच्या मदतीने अपहरण करून मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अशी माहिती अशी की, चंदनपुरी गावातील रिक्षाचालक ज्ञानेश्वर लालचंद महाले यांची कन्या ही शिक्षणासाठी अजंग येथील प्रशांतनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या आजी निर्मला शेलार यांच्याकडे वास्तव्यास होती. मालेगाव येथील भारत विद्यालयात दुसरीत शिकत असलेल्या भाविकाने सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आजीबरोबर जेवण केले. यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास गावातील एकाकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने आजी निर्मला शेलार भाविकास घरात खाटेवर झोपवून पुरणपोळी करण्यासाठी जाधव यांच्याकडे गेल्या. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास निर्मला शेलार घरी परतल्या असता त्यांना घरात भाविका नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने त्यांनी आरडाओरड करत परिसरात राहणार्‍या निंबा बोरसे, रूपेश जाधव, केदारनाथ महाले, रामदास गोविंद यांना नात घरात नसल्याचे सांगितल्याने त्यांनी बालिकेचा गावात शोध घेण्यास प्रारंभ केला. मात्र ती कुठेही आढळून न आल्याने वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात वडील ज्ञानेश्वर महाले यांनी मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद दाखल दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेपत्ता झालेल्या भाविकाचा कुटुंबियांसह पोलिसांतर्फे सर्वत्र शोध गत दोन दिवसांपासून घेतला जात होता.

त्यानंतर गावालगतच मोसम नदीकाठावर असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहिरीत बालिकेचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भाविकाचा घातपात झाल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मालेगाव-नामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनास प्रारंभ केला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी अधिकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत विहिरीतून बालिकेचा मृतदेह बाहेर काढत तो उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात हलवला व नंतर सदर मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. रास्ता रोको आंदोलन करणार्‍या संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत भाविकाच्या मारेकर्‍यास अटक होत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. स.पो. अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. संशयिताचा त्वरित शोध घेत त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही संधू यांनी दिल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता पोलिसांना अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघांना अटक केली आहे. संशयित योगेश शिवदास पटाईत हा मुलीच्या शेजारी रहात होता. दोघा कुटुंबात नेहमी वाद होत असल्याने योगेश याने नीलेश ऊर्फ रवी पवार याच्या मदतीने अपहरण करून मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Protected Content