नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जमनी तेलामी, देऊ आतलामी, अशी मृतांची नावे असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हे प्रकरण दुसऱ्या दिवशी उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत महाराष्ट्र दिन १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजताच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. दरम्यान, पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून परिसरात विचारपूस सुरू केली. तपासादरम्यान गुन्ह्याचा उलगडा झाला आणि घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झालेले आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी रितसर कारवाई करत आतापर्यंत याप्रकरणी गावातील एकूण 15 जणांना अटक केली असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (60) आणि मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचा देखील समावेश आहे.
बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून दोन जणांना गावकऱ्यांनी जिवंत जाळले
8 months ago
No Comments