मुंबई (वृत्तसंस्था) एव्हरेस्ट मोहीम पूर्ण करून परत येत असताना ठाणेकर गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. कुलकर्णी यांच्यापाठोपाठच गुरुवारी संध्याकाळी राज्यातील दुसरा गिर्यारोहक निहाल बागवान यांचाही मृत्यू ओढवला आहे. निहाल हा अकलूज येथील रहिवासी होता. दोन्ही गिर्यारोहकांचा मृत्यू माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर चौथ्या बेस कॅम्पजवळ झाला. हा बेस कॅम्प २६ हजार फुटांवर असल्याने या दोघांचीही पार्थिव शरीरे खाली आणण्यासाठी वेळ लागत असून शनिवारी हा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गिर्यारोहक अंजली कुलकर्णी या गेली पाच वर्षे एव्हरेस्टसाठी प्रयत्नशील होत्या, त्या ५४ वर्षांच्या होत्या. मात्र एव्हरेस्ट शिखर सर करणे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी काही शिखरे सर केल्याची माहितीही समोर येत आहे. त्यांनी आणि त्यांचे पती शरद कुलकर्णी या दोघांनीही एव्हरेस्ट सर केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला होता. मात्र शिखराकडे जाण्या-येण्याच्या मार्गावर गिर्यारोहकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने त्यांना अपेक्षित वेळेत खाली उतरता येऊ शकले नाही, आणि त्यांच्या जवळचा ऑक्सिजन संपून त्यांचा मृत्यू झाला. शरद कुलकर्णी यांनाही फ्रॉस्टबाइटचा त्रास झाला असून त्यांना तत्काळ काठमांडूला नेण्यात आले आहे. कुलकर्णी यांचा मुलगा काठमांडू येथे पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कुलकर्णी यांच्याप्रमाणेच बागवान यांनीही शिखर सर केल्यानंतर गर्दीमुळे योग्य वेळेत परतू न शकल्याने त्यांनाही त्रास झाला, ते २६ वर्षांचे होते.
एकाचवेळी निघाले २५० गिर्यारोहक :- एव्हरेस्ट सर करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने सुमारे २५० गिर्यारोहक शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले होते. चौथ्या कॅम्पपासून शिखरापर्यंत एका वेळी एकच गिर्यारोहक पुढे जाऊ शकतो एवढीच वाट असल्याची माहिती गिर्यारोहणतज्ज्ञ उमेश झिरपे यांनी दिली. शुक्रवारी संध्याकाळी कुलकर्णी आणि बागवान यांचे पार्थिव आणण्यासाठी भारतीय दूतावासाने परवानगी दिल्याने शेरपांची तुकडी रवाना झाल्याची माहिती देण्यात आली. शनिवार आणि रविवार हे दोनच दिवस वातावरण चांगले राहण्याची शक्यता असल्याने ही दोन्ही पार्थिव शरिरे खाली आणण्यासाठी फार कमी कालावधी मिळणार आहे. कुलकर्णी यांचे पार्थिव शिखरापासून अवघ्या काही अंतरावर आहे, तर निहालला त्रास होत असल्याने शेरपांच्या मदतीने त्याला चौथ्या कॅम्पपर्यंत आणण्यात आले आणि तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हेलिकॉप्टर जाणेही अशक्य :- एव्हरेस्टवर दुसऱ्या कॅम्पच्या पलीकडे हेलिकॉप्टर झेपावू शकत नाही. त्यामुळे दोन्ही पार्थिव चौथ्यावरून तिसऱ्या आणि मग तिसऱ्यावरून दुसऱ्या कॅम्पपर्यंत आणायला लागणार आहेत. यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या कॅम्पमधील प्रवासही खडतर आहे, असे गिर्यारोहणतज्ज्ञ आणि एव्हरेस्टवीर हृषिकेश यादव यांनी सांगितले. वेळेचे गणित बिघडल्यास ऑक्सिजन संपतो आणि ऑक्सिजन संपला की, समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते. यासाठी अनुकूल कालावधीत शिखर सर करू इच्छिणाऱ्यांच्या लहान-लहान तुकड्या करून नियोजन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.