जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५० टक्के नव्या चेहऱ्यांचा समावेश असेल अशी चर्चा आहे. त्यामुळे खा.रक्षाताई खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतरही रक्षाताई यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती.
विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांनी मतदार संघातील प्रत्येक आदिवासी पाड्यावर भेट दिली आहे. तसेच रक्षाताई यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. विकास कामांमुळे देखील त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा आहे. जिल्ह्यात सलग काही वर्षापासून सैन्यभरती आणण्यासाठी रक्षाताई यांनी केलेले विशेष प्रयत्न तसेच विविध प्रवाशी रेल्वे गाड्याना थांबा मिळवून दिल्यामुळे त्यांचे केंद्रातील वजन अधोरेखित होते. तसेच मागील सरकारच्या कार्यकाळात अनेक विदेश दौऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. एकंदरीत या सर्वबाबी लक्षात घेता रक्षाताई यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, यासाठी एकनाथराव खडसे देखील प्रयत्न करतीलच. कारण पुढील दोन-तीन महिन्यात राज्यात देखील निवडणुकांचे वारे वहायला सुरुवात होईल.