जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात वेगवेगळ्या भागात घरफोडी करण्यासह इतर शहरांमधीलही गुन्ह्यात फरार असलेल्या बंटीकुमार पंचानंद सिंग (३१, रा. घांगसिरसी जि. पटणा, बिहार, ह.मु. अमरोली, सुरत) व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी) (३०, रा. लुसुडीया खेमा, जि. उज्जैन, ह.मु. सुरत) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील नागदा येथून अटक केली आहे.
वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी सहायक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलिस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोका महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार करुन त्यांना जळगाव शहर व परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याविषयी सूचित केली.
नवीपेठ भागातील विनीत आहुजा (रा. सिध्दी कॉलनी) यांचे मोबाईल दुकान तसेच नवीपेठ भागात झालेल्या चोऱ्यांसंदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती काढण्यासह तांत्रिक विश्लेषनावरुन गुन्ह्यात आंतर राज्यातील घरफोडी करणारे बंटीकुमार पंचानंद सिंग व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी) यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना मध्य प्रदेशातील नागदा येथून घरफोडीच्या साहित्यासह बुधवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ताब्यात घेतले. दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी जळगाव शहरातील गुन्ह्यांसह इतर राज्यात घरफोडी केल्याचे कबूल केले. दोघांकडून वेगवेगळ्या राज्यातील बनावट आधार कार्ड व चोरी केलेले महागडे तीन मोबाईल फोन व नऊ हजार ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.