विद्यापीठात दोन वसतिगृह बांधून देणार- मंत्री विजयकुमार गावित (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड न्यूज । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रत्येकी २५० विद्यार्थी व विद्यार्थिनी क्षमतेचे दोन वसतिगृह बांधून देण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग व विविध खेळांच्या प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी डॉ. गावित बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील होते. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, खा. रक्षा खडसे, आ. शिरीष चौधरी, आ.लता सोनवणे, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अधिक्षक अभियंता व्ही.ए.पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

याच समारंभात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले. तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन डॉ.गावित यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलतांना डॉ.गावित म्हणाले की, विद्यापीठाच्या सहकार्याने आदिवासी आश्रमशाळेतील ३०० विद्यार्थ्यांना योग व क्रीडा प्रशिक्षण देण्यात आले. यातून उत्तम खेळाडू निश्चित घडतील अशी अपेक्षा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुण असतात. फक्त त्यांना संधीची उपलब्धता व त्यांच्या गुणांना आकार देण्याची गरज आहे. राज्यातील क्रीडा संघटनांच्या सहकार्याने विविध स्पोर्टस क्लब मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पाठवून या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सुट्टयांच्या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करुन देत खेळाडूंना प्रशिक्षण द्यावे त्याचा खर्च आदिवासी विभागाकडून केला जाईल असे डॉ.गावित म्हणाले. हे विद्यापीठ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम कुलगुरुंच्या नेतृत्वाखाली उत्तमपणे करीत आहे. या विद्यापीठासाठी सहकार्याची भूमिका राहणार आहे. वसतिगृह बांधून दिले जाईल. येत्या मार्च महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले. आपल्या भाषणात डॉ.गावित यांनी आदिवासी मुलांचे वसतिगृह, आश्रमशाळा यातील प्रश्नांचा उहापोह करतांना एकलव्य निवासी मॉडेल शाळेसाठी जिल्ह्यातील ज्या भागात २०हजारापेक्षा अधिक आदिवासी राहतात त्या भागातील प्रस्ताव तयार करुन देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथे राहणे बंधनकारक केले जाईल. विद्यार्थ्यांना सुट्यांव्यतिरिक्त घरी पाठवले तर त्या वसतिगृहाच्या वॉर्डन / मुख्याध्यापक यांना निलंबित केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. डिसेंबरपर्यंत आराखडयाप्रमाणे रिक्त जागा भरल्या जातील. येत्या दोन वर्षात आदिवासी वाडया व पाडयांना रस्ते व वीज दिले जाईल. प्रकल्पस्तरावर होणाऱ्या स्पर्धेतील खेळाडूंना विद्यापीठाने प्रशिक्षण द्यावे अशी अपेक्षाही डॉ.गावित यांनी व्यक्त केली.

खा.उन्मेष पाटील यांनी केंद्र व राज्य सरकार आदिवासी विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून विद्यापीठाच्या नंदुरबार व धुळे येथील उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. खा. रक्षा खडसे यांनी आदिवासी शाळांमध्ये क्रीडा शिक्षक दिले जावेत तसेच आदिवासी बहुल गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देण्याची मागणी केली. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक महेश तडवी तसेच शिबिरार्थी शुभम बारेला व संजना पावरा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. योग मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अभि.राजेश पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील व राधेश्याम पाटील यांनी केले. सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content