भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिया कॉपर मास्टर अलायन्स कंपनी ही भुसावळ तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑईल टाकीला दोन कर्मचारी वेल्डिंग करण्याचे काम करत होते. वेल्डिंग करतांना अचानक शार्टसर्किमुळे मोठा स्फोट झाला. कॉपर प्लेट तयार करणाऱ्या काॅपर मास्टर अलाईस अँड कंपनीत गोडाऊनच्या बाहेर सुमारे एक हजार लिटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. या टाकीत ज्वलनशील ऑइलचा साठा केला जातो. शुक्रवारी दुपारी १२ वाजता काशिनाथ सुरवाडे व खेमसिंग पटेल हे दोघे वेल्डिंगचे काम करत होते. सुरवाडे हे टाकीच्या खाली उभे राहून वेल्डिंग करत हाेते. तर पटेल टाकीच्या वरील भागावर बसून काम करत होते. टाकीचा अचानक स्फोट झाला. त्या वेळी पटेल यांचा तोल जाऊन ते पेटलेल्या ऑइलच्या टाकीत पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच स्फोटामुळे उडालेले गरम ऑइल अंगावर पडून बाहेर असलेले सुरवाडे यांचाही होरपळून जागेवरच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत काशिनाथ सुरवाडे रा. खेडी रोड जळगाव आणि खेमसिंग पटेल रा. बेमतेरा. छत्तीसगड या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. झालेल्या घटनेत स्फोटात मोठा आवाज झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. परिसरातील नागरीकांना धाव घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस ठाण्याचे सपोनि प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मयत झालेले कर्मचाऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कंपनीकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत सुरू केली. या आगीत कंपनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पाेलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऑइलच्या टाकीत पडून मृत्यू झालेल्या खेमसिंग पटेल यांचा मृतदेह बाहेर काढला. खेमसिंग आणि टाकीच्या बाहेर पडलेले काशिनाथ सुरवाडे यांचा मृतदेह उचलून जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.