जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रात्रीच्या सुमारास रामनगरातील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांचा एलसीबीने बुधवारी २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उमर कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्यांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (रा. उमर कॉलनी) व समीर उर्फ तात्या शेख सलीम (रा. पिंप्राळा हुडको) या दोघांना अटक केली त्यांच्याकडून चोरलेले २० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील राम नगरात राहणारे ऋषीकेश येवले यांच्या घरातून १५ ते १७ रोजी दरम्यान घरफोडी झाली होती. याठिकाणाहून चोरट्यांनी २५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना ही चोरी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या खाटीक याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार राजेश मेढे, रवी नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकॉ प्रवीण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, प्रमोद ठाकूर यांचे पथकाकडून संशयिताचा शोध घेतला जात होता.
संशयित अबरार उर्फ चिरक्या खाटीक हा उमर कॉलनीत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या मुसक्या अवळल्या. त्याची कसून चौकशी करताच त्याने ही चोरी त्याचा साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम याच्या मदतीने केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या सोन्यापैकी २० ग्रॅम सोने देखील काढून दिले. संशयित अबरार याच्याविरुद्ध यापुर्वी चार गुन्हे दाखल असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.