जामनेर (प्रतिनिधी) । तालुक्यातील कुंभारी बु ॥ ता. जामनेर येथील रामदेव बाबा मंदीरातील दानपेटी फोडून सुमारे १६ हजार ४६५ रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून पहुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे रामदेवजी बाबा यांचे मंदीर आहे. याठिकाणी शिवदास गुरदाल राठोड हे पुजारी म्हणून काम करतात. २२ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या चोरट्यांनी मंदीरातील दानपेटी फोडून सुमारे १६ हजार ४६५ रूपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. चोरी झाल्यानंतर पुजारी शिवदास राठोड यांनी गावात दवंडी देवून मंदीरात चोरी झाल्याबाबत माहिती देण्यात आली होती. याबाबत पोलीसांनी देखील तक्रार देण्यात आली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुकेश डिगंबर बाबर (वय-२१) रा. आष्टुर ता. लोहा जि. नांदेड आणि राजू जगन्नाथ सुरळकर (वय-२१) रा. दहिगाव ता. भोकरदन जि. जालना यांना पहूर पोलीसांनी अटक केली आहे. पुजारी शिवदास राठोड यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.