बिबट्याच्या हल्ल्यात बारा वर्षीय बालक जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री गावा जवळील वड्री धरण परिसरात मनमादेवी मंदिर असुन या मंदिरा जवळ सांडव्याच्या पाण्यात बिबटचे काही बछडे पाणी पिण्यासाठी आले असता त्या ठिकाणी एका बारा वर्षीय बालक उपस्थित होता. या बालकावर अचानक एका बछड्याने पाठीवर हल्ला केला. त्यात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. हा प्रकार परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणाहून बिबट्या आणि त्याचे बछडे गर्दी पाहून पळून गेले.

( प्रतिकात्मक संग्रहीत छायाचित्र )

हल्ल्यात जखमी झालेल्या या बालकाला तातडीने तेथून यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आणण्यात आले असून त्यांच्यावर या ठिकाणी प्रथम उपचार करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र आज या घटनेवरून वड्रीसह परिसरात काही बछड्यांसह बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने जेरबंद करून बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यातील जंगलात सोडावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वड्री तालुका यावल येथून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री धरण आहे. या धरणाजवळ मनमादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ शनिवारी दुपारी विनोद रुपसिंग बारेला वय १२ हा बालक सांडव्यातील पाण्याजवळ गेला होता. दरम्यान तेथे बिबट आणि त्याचे पाच बछडे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यातील एका बछड्याने या बालकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बालकाने तेथुन धाव घेतली असता बिबटच्या बछड्याने त्याच्या पाठीवर पंजा मारला व त्यास दुखापत केली.

हा प्रकार इतर नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी गर्दी करून तेथे धाव घेतल्यामुळे गर्दीला पाहून बिबट आणि त्याचे बछडे तिथून पळुन गेले. दरम्यान तातडीने या बालकाला यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.शर्मा, मंजुषा कोळेकर, अतिश खडके यांनी त्याच्यावर प्रथम उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. धरण धरण परिसरात एक बिबट्या आणि त्याचे पाच बछड्यांचा वावर करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी रूपसिंग बारेला यांनी सांगितले. अनेक वेळा सांडव्यात पाणी पिण्यासाठी ते येत असतात. या घटनेत बालक थोडक्यात बचावला आहे. तेव्हा वनविभागाने या बिबट आणि त्याच्या बछड्यांना अभयारण्यात सोडावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Protected Content