धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथून जाणार्या महामार्गावर ट्रकमधून गोमांसाची तस्करी होत असल्याच्या आरोपातून संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना रात्री उशीरा घडली आहे.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास एक ट्रक पाळधी येथून जात असतांना यातून दुर्गंध येऊ लागला. यामुळे यातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी या संदर्भात पाळधी पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्यांना माहिती देऊन ट्रक थांबवून धरला. पोलिसांनी याबाबतची माहिती घेऊन ट्रकला पाळधी बायपास येथील गोडावूनकडे रवाना केले. यावेळी पोलिसांनी ट्रक सोडल्याच्या समजातून जमावाने ड्रायव्हरला मारहाण करत ट्रक पेटवून दिला.
यामुळे परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तातडीने येथे अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने वातावरण निवळले. तर या प्रकारामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. तर, रात्रीच जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.