Home क्राईम पैशांच्या व्यवहारातून वाद; महिलेला दांडक्याने मारहाण, एकावर गुन्हा दाखल

पैशांच्या व्यवहारातून वाद; महिलेला दांडक्याने मारहाण, एकावर गुन्हा दाखल


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या व्यवहाराच्या वादातून एका ५५ वर्षीय महिलेला आणि त्यांच्या पतीला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाने घेतलेल्या पैशांच्या वादातून चिडलेल्या एकाने दांडक्याने महिलेच्या डोक्यावर प्रहार करून तिला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वत्सलाबाई रघुनाथ ठाकरे (वय ५५, रा. धार, ता. धरणगाव) या १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर सार्वजनिक जागेत होत्या. यावेळी आरोपी कैलास सुपडू ठाकरे याने वत्सलाबाई यांच्याकडे त्यांच्या मुलाने घेतलेल्या पैशांची मागणी केली. त्यावर “तुमचा पैशांचा व्यवहार मला माहित नाही,” असे वत्सलाबाई यांनी सांगताच आरोपीचा राग अनावर झाला.

अमानुष मारहाण आणि शिवीगाळ :
रागाच्या भरात कैलास ठाकरे याने जवळ असलेल्या कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने वत्सलाबाई यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने वत्सलाबाई यांचे पती मध्यस्थीसाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत पाठीवर, पोटावर आणि तोंडावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे.

पोलीसात गुन्हा दाखल :
याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कैलास ठाकरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अर्जून कुवारे हे करीत आहे.


Protected Content

Play sound