मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कार्यकाळाचा ‘द एंड’ : आता प्रशासक राज !

मुक्ताईनगर-पंकज कपले | येथील नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिकचा कार्यकाळ आज पूर्ण झाला असून उद्यापासून येथे प्रशासक राज येणार आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

मुक्ताईनगरात आधी ग्रामपंचायत होती. २०१८ साली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. यानंतर १७ जुलै २०१७ रोजी नगरपंचायतीची पहिली निवडणूक पार पडली. यात नगराध्यक्षपदी तत्कालीन भाजपमध्ये असलेले माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यश मिळाले. यात लोकनियुक्त नगराध्यक्षपदी नजमा तडवी यांनी विजय संपादन केला. तर नगरपंचायतीत भाजपला बहुमत देखील मिळाले. एक महिन्याने अर्थात १७ ऑगस्ट २०१८ रोजी नगरपंचायतीत नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सूत्रे सांभाळली.

यानंतर तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली. यात प्रामुख्याने २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे पराभूत झाल्या आणि चंद्रकांत पाटील निवडून आले. तर लागलीच महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाले. यामुळे नगरपंचायतीतील भाजपचे अनेक नगरसेवक हे आमदार पाटील यांच्यासोबत जुडले. तर, एकनाथराव खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर नगरपंचायतीतही याचे पडसाद उमटले. या गदारोळात नगराध्यक्षा नजमा तडवी या मात्र खडसे यांच्यासोबत गेल्या नाहीत.

यथावकाश नजमा तडवी यांच्याविरूध्द जात पडताळणीच्या मुद्यावरून अपात्र करण्यात यावे असे अर्ज करण्यात आले. यात त्या अपात्र झाल्या. यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराची सूत्रे ही उपनगराध्यक्षांकडे आलीत. तर, अलीकडेच नजमा तडवी यांच्या अपात्रतेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे त्या शेवटच्या काही दिवसांसाठी का होईना पण पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. यातच आज म्हणजे १७ ऑगस्ट रोजी नगराध्यक्षा तसेच १७ नगरसेवक आणि २ स्वीकृत नगरसेवक यांचा कार्यकाळ संपला. अर्थात, यासोबत आता मुक्ताईनगर नगरपंचायतीवर प्रशासक राज देखील लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content