जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कालिकामाता मंदिराजवळ महामार्गावर हॉटेल कमल पॅराडाईजनजीक आज सायंकाळी एक ट्रक उलटून झालेल्या अपघातात काही काळ वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेनंतर ट्रक चालक मात्र फरार झाला असून पोलिसात अपघाताची नोंद केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, धुळे येथून अमरावतीकडे साड्या घेवून निघालेला हा आयशर ट्रक (एम.एच.१८, बी.जी.४३८३) ओव्हरलोड असल्याने डगमगत चालत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक महामार्गावर उलटला. ट्रक उलटल्यानंतर चालक अनिल राठोड (रा.अमळनेर) हा घटना स्थळाहून फरार झाला आहे. सुदैवाने यात कुणी मृत अथवा जखमी झालेले नाही. त्यातच ट्रकमालकाचे मित्र वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मालाचीही काही हानी झालेली नाही. सायंकाळी बातमी लिहित असेपर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम पूर्ण झालेले नव्हते.