भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणारे भुसावळचे सुपुत्र शहीद नरेंद्र ओंकार महाजन यांच्या हौतात्म्याला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सीआरपीएफ आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आली.
भुसावळातल्या विद्यानगर भागातील रहिवासी नरेंद्र ओंकार पाटील हे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. 11 ऑगस्ट 1999 रोजी मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ शहरातील रेडिओ केंद्राच्या संरक्षणात तैनात असतांना येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात प्रतिकार करतांना नरेंद्र महाजन यांना वीरमरण प्राप्त झाले.
दरम्यान, नरेंद्र महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज विद्यानगर मित्र मंडळासह परिसरातील त्यांच्या सर्व मित्रांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमाला सीआरपीएफच्या पुणे येथील मुख्यालयातील एक खास पथक भुसावळात आले होते. त्यांच्या मानवंदनेसह हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद नरेंद्र महाजन यांच्या अर्धांगिनी श्रीमती अर्चना नरेंद्र महाजन, त्यांच्या भगिनी व आप्तस्वकीय तसेच पुण्याहून आलेल्या सीआरपीएफच्या पथकातील एसआय जी. डी. एस. पी धुमाळ व अनिल भोवते व राहूल निकम आदी मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शहीद नरेंद्र महाजन अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमला.
यानंतर, शहीद नरेंद्र महाजन यांच्या स्मारकाला वंदन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष युवराज लोणारी, दिनेश भंगाळे यांच्यासह सीआरपीएफच्या पथकातील एसआय जी. डी. एस. पी धुमाळ व अनिल भोवते तसेच शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शहीद नरेंद्र महाजन यांचे सुपुत्र स्वराज महाजन हे मर्चंट नेव्हीत कार्यरत असून सध्या जहाजावर असल्याने ते घरी परतल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत विद्यानगरातील वेडीमाता मंदिराजवळ मोठा कार्यक्रम घेण्यात येईल असे याप्रसंगी जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमाला शहीद नरेंद्र महाजन यांच्या कुटुंबियांसह आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक मुकेश पाटील, शेखर पाटील, दिनेश भंगाळे, किशोर आसोदेकर, राकेश कोल्हे, हेमंत चौधरी, राजेश नेमाडे, राकेश चौधरी, विलास चौधरी, प्रमोद शुक्ला आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज शहीद नरेंद्र महाजन यांच्या हौतात्म्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असतांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन तर दूरच पण त्यांना अभिवादन करण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका वा अन्य कोणत्याही खात्याचे अधिकारी न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर या स्मारकाचे नूतनीकरण देखील करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.