
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पांढरीवस्ती आदिवासी गावपाड्यावर गेल्या एक ते दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कूपनलिकेची मोटर जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला असून, वारंवार मागणी करूनही समस्या सुटत नसल्याने संतप्त आदिवासी महिला व नागरिकांनी यावल पंचायत समितीसमोर हंडा मोर्चा काढत ‘भिक मांगो’ आंदोलन केले.

मोहराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पांढरीवस्ती येथे कूपनलिकेवरून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून कूपनलिकेची मोटर जळाल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे महिलांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, ठोस कार्यवाही न करता वेळकाढूपणाची व उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या आदिवासी महिला व नागरिकांनी पंचायत समिती कार्यालय गाठून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हंडा मोर्चा काढला. बिरसा महामानव संघटनेच्या वतीने बिरम बारेला यांच्या नेतृत्वाखाली हे ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महिलांनी रिकामे हंडे घेऊन पिण्याच्या पाण्याची मागणी केली. गावातील मूलभूत प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने कूपनलिकेची मोटर दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पांढरीवस्तीतील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून पाण्यासाठी सुरू असलेल्या या संघर्षामुळे पांढरीवस्तीतील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.



