जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या कम्युनिटी फिजिओथेरपी विभागाने जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या वृक्षारोपण मोहिमेचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण करणे, महाविद्यालयाचा परिसर हिरवागार ठेवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा होता. प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांनी यावेळी बोलताना पर्यावरणाचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा घनिष्ठ संबंध विशद केला. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या परिसरात एकूण ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे जतन करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.