भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर आज रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर आमदार संजय सावकारे यांच्यासह संतप्त जमावाने रास्ता रोको आंदोलन केल्याने ट्रॅफीक जाम झाली असून दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी प्रमोद वना झोपे ( वय ५८ ) हे आपला मुलगा धीरज प्रमोद झोपे ( वय ३२) यांच्यासह दुचाकीवरून जात होते. महामार्गावर बालाजी लॉनच्या समोर भरधाव वेगाने येणार्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात प्रमोद वना झोपे हे जागीच ठार झाले असून धीरज झोपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच आमदार संजय सावकारे यांच्यासह झोपे कुटुंबियांच्या आप्तांनी थेट राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात कोंडी झाली.
डीवायएसपी पिंगळे यांनी आपल्या सहकार्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी आमदार संजय सावकारे यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली. यामुळे रात्री अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे दोन्ही बाजूंनी झालेली वाहतुकीची कोंडी ही हळूहळू मोकळी होण्यास प्रारंभ झाला आहे.