भुसावळात भीषण अपघात : एक ठार, एक जखमी; आमदारांसह जमावाचे आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आज रात्री झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जबर जखमी झाले असून या अपघातानंतर आमदार संजय सावकारे यांच्यासह संतप्त जमावाने ठिय्या आंदोलन केले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी प्रमोद वना झोपे ( वय ५८ ) हे आपला मुलगा धीरज प्रमोद झोपे ( वय ३२) यांच्यासह दुचाकीवरून जात होते. महामार्गावर बालाजी लॉनच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यात प्रमोद वना झोपे हे जागीच ठार झाले असून धीरज झोपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोन्ही बाप-लेक विवाह सोहळ्याला हजेरी लाऊन घरी परत येत असतांना रात्री नऊ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. तर वाहनधारकाने यांना उडविल्यानंतर घटनास्थळावून पलायन केले आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रसंगी जमाव संतप्त झाला. आमदार संजय सावकारे हे देखील अपघातस्थळी दाखल केले. या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी जमावाने रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावरच ठिय्या मांडला. यात आमदार संजय सावकारे हे देखील सहभागी झाले. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले असून नोंद करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Protected Content