मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आषाढी एकादशीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्यांच्या वाहनांना राज्यात टोल लागणार नसल्याची महत्वाची घोषणा आज केली आहे.
आषाढी निमित्त पंढरपुरकडे लक्षावधी वारकरी निघालेले असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्यांसाठी खास एक घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.” यासाठी वारकर्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन पावसाळच्या पार्श्वभूमिवर दक्ष राहण्याचे निर्देश दिलेत. तसेच त्यांची टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून याचे काम वेगाने करण्याचे निर्देश दिलेत.