शांततेत आंदोलने कशी करायची हे आजची तरुणाई प्रत्येकाला शिकवतेय ; हायकोर्टाकडून कौतुक

 

Bombay High Court

 

मुंबई (वृत्तसंस्था) शांततेत आंदोलने कशी करायची हे आजची तरुणाई प्रत्येकाला शिकवत आहे. त्यामुळे त्यांच्या आवाजाची ताकद वाढली आहे, अशा शब्दात जेएनयू हल्ल्याविरोधात मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर तरुणांनी केलेल्या आंदोलनाचे हायकोर्टाने कौतुक केले आहे.

 

दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील तरुणाईनेही निषेध करत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे धरणे आंदोलन सुरु केले होते. मात्र हे आंदोलन अतिशय शांततेत पार पाडण्यात आले. या आंदोलनादरम्यान ध्वनी प्रदुषणाची एकही तक्रार आली नाही. त्यामुळे या आंदोलनाची थेट हायकोर्टाने कौतुक केले आहे. शिवाजी पार्कसंदर्भात विकॉम ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपिठानं या आंदोलनाचे कौतुक केले आहे.

 

मुंबईतल्या गेट-ऑफ इंडियाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांना ३६ तासांची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले. गेट वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होतोय. तसंच पर्यटकांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. मात्र त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

Protected Content