राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी आजचा दिवस महत्वाचा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीची आज बैठक होत असून यात राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याने पक्षासाठी आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा असेल असे मानले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती पुस्तकाच्या दुसर्‍या खंडाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपण अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे सांगत निवृत्तीचे सूतोवाच केले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रवादीत तर याची साहजीकच तीव्र प्रतिक्रिया उमटली. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेली मागणी लक्षात घेऊनही शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम असून पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी भूमिका घेण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे.

या बैठकीत शरद पवार हे नेमका काय निर्णय घेणार ? पक्षाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळून पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील का ? की ते अजून काही दिवस अध्यक्ष राहतील ? या सर्व प्रश्‍नांची उत्तर समोर येण्याची शक्यता आहे. आज सकाळी ही बैठक होत असून यात नेमका काय निर्णय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content