नाकर्तेपणा लपवण्यासाठीच घृष्णेश्वर पाटील यांचे राजीनामा नाट्य- राजीव देशमुख (व्हिडीओ)

rajiv deshmukh press

चाळीसगाव, प्रतिनिधी | आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी घृष्णेश्वर पाटील यांनी राजीनामा नाट्य केले असून त्यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे आज (दि.७) न.पा. विरोधी पक्ष गटनेते व माजी आमदार राजीव देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सुमारे ४५ वर्षे आमच्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता असताना कुठल्याही भ्रष्टाचाराला मी पाठीशी घातले नाही असेही ते यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी गेल्या ४ नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत नगर पालिकेतील विरोधी पक्ष गटनेते राजीव देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे व मनमानीचे आरोप करीत तसेच मनपातील अधिकारी-कर्मचारी आपले ऐकत नाही, असे सांगून नगराध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्त केला होता.

या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी आमदार राजीव देशमुख यांनी आज ही पत्रकार परिषद बोलावली होती. गेल्या तीन वर्षात नगरपालिकेमध्ये अनागोंदी झाली असून दोन मुख्याधिकारी आपला कार्यकाळ संपण्याआधीच बदलून गेले आहेत तर गेल्या पाच महिन्यांपासून नगरपालिका मुख्याधिकाऱ्याविना आहे, हे सत्ताधारी गटाच्या कामकाजाचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची तक्रार करुन सविस्तर चौकशी करावी, मी त्यासाठी तयार आहे. असे सांगतानाच आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात अव्वाच्या सव्वा दराने वस्तू खरेदी करून नगरपालिकेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

८५ रुपयांचे घमेले १८० रुपयांना, ६० रुपयांची पावडी १८० रुपयांना, २० रुपयाचा खराटा १५० रुपयांना प्लास्टिकची रिकामी खत गोणी त्याची किंमत १९ रुपये आहे ती १९९ रुपयांना तर १८० रुपयाचा कागद रिम ७०० रुपयांना खरेदी केले जात असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले तर आम्ही चुकीचे काम करत नाही म्हणून कर्मचारी आमचे ऐकत असावेत अशीही यावेळी त्यांनी सांगितले आणि त्यांना राजीनामा द्यायचा होता तर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला हवा होता. नगराध्यक्षांकडे दिलेला राजीनामा हे केवळ नाटक असल्याचे यावेळी राजीव देशमुख यांनी सांगितले.

यावेळी गटनेते राजीव देशमुख, उपगटनेते सुरेश स्वार, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक आनंदा कोळी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, शेखर देशमुख, सदाशिव गवळी, फकीरा बेग, जगदीश चौधरी, योगेश पाटील, शुभम पवार, प्रताप भोसले, आकाश पोळ, सोनु अहिरे, कुणाल पाटील, कौस्तुभ राजपूत, राजेंद्र मोरे, आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content