मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडीने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवाय सत्तेत आपण पुन्ह येवू असा विश्वासही त्यांना वाटू लागला आहे. अशावेळी मविआत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटांने जास्तीत जास्त जागा पदरात कशा पडतील यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे मविआतील प्रमुख तीन पक्षात जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना त्यात आता घटक पक्षांनीही उडी घेतली आहे. समाजवादी पक्षाने आपल्याला १० जागा मिळाल्याच पाहीजे अशी मागणी केली आहे. पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ही मागणी केलीय.
समाजवादी पक्षाचे दोन आमदार सध्या विधानसभेत आहेत. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नाही. पण मविआच्या उमेदवारांना विजयी करण्यात त्यांचा हातभार लागला आहे.लोकसभेला तडजोड केली पण विधानसभेला तडजोड करण्याच्या मानसिकतेत अबू आझमी नाहीत. विधानसभेच्या दहा जागा समाजवादी पक्षाला मिळाव्या असे ते म्हणाले. जर तसे झाले नाही तर आम्ही दिल्ली अखिलेश यादव यांची भेटी घेणार आहोत. अखिलेश आणि राहुल गांधी यांची सध्या चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या समोर शब्द टाकू असेही ते म्हणाले. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा दिल्ली दरबारी नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.