कंदहार विमान अपहरणावेळी अतिरेक्यांकडे ओलीस राहण्यास ममता तयार होत्या

 

 

कोलकाता: वृत्तसंस्था । माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गौप्यस्फोट केला कि  कंदहार अपहरणात ममता बॅनर्जी  यांनी  प्रवाशांची सुटका होत असेल तर मला अतिरेक्यांकडे ओलीस म्हणून पाठवा, असा प्रस्तावच तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर ठेवला होता.

कोलकात्यात टीएमसीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी कंदहार घटनेचा उल्लेख करत त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याची माहिती दिली. अतिरेक्यांनी विमानाचं अपहरण केलं होतं. त्यामुळे प्रवाशांच्या सुटकेसाठी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जींनी स्वत: अतिरेक्यांकडे ओलीस राहण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. मी स्वत: अतिरेक्यांच्या ताब्यात जाईल. पण माझ्या बदल्यात अतिरेक्यांनी सर्व प्रवाशांना सोडून द्यायला हवं, अशी अट अतिरेक्यांना घालण्यासही त्यांनी सांगितलं होतं. देशासाठी जी काही कुर्बानी देता येईल ती द्यायला मी तयार आहे, असंही ममतादीदींनी सांगितलं होतं, असा दावा सिन्हा यांनी केला आहे.

 

 

यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीचे राष्ट्रीय स्तरावर परिणाम होतील. ही निवडणूक संपूर्ण देशासाठी एक संदेश असेल. ही निवडणूक म्हणजे भाजपकडून सुरू केलेला अश्वमेघ यज्ञ असून यात त्यांना कुणाचाही विरोध नको आहे. त्याला बंगालला रोखावं लागेल, असं सिन्हा म्हणाले. केवळ निवडणूक प्रचारासाठी येऊन टीएमसीचा प्रचार करूनही मी जाऊ शकलो असतो. मात्र, टीएमसीमध्येच प्रवेश करून टीएमसीला मदत करावी असं वाटलं, त्यामुळेच मी टीएमसीमध्ये प्रवेश केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटतं हा सुनियोजित हल्ला होता. काही असामाजिक तत्त्वांनी ममता बॅनर्जींना जखमी करण्यासाठी गाडीच्या दरवाजाचा वापर केला, असं सांगतानाच या निवडणुकीत टीएमसीला भरघोस यश मिळणार आहे, त्याबद्दल माझ्या मनात कोणतंही दुमत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Protected Content