उठलेल्या वावड्यांमुळे मी अस्वस्थ झाले – पंकजा मुंडे

maharashtra bjp leader pankaja munde file pic 1575197466

मुंबई, वृत्तसंस्था | मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. मात्र १ डिसेंबर ते १२ डिसेंबर ज्या-ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले, असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. मी पॉवरगेम खेळते आहे, मी विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे, अशाही काही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते, अशी घोषणा केली. असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

“मी भाजपा सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून गेलेली नाही. कोअर कमिटीमध्ये मी राहणार नाही हा निर्णय मी घेतला. कारण १ डिसेंबर ते १२ डिसेंबर या १२ दिवसांमध्ये ज्या काही चर्चा रंगल्या त्यामुळेच मी हा निर्णय घेतला असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. मी हे पद स्वतःसाठी सोडलं” असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

“एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेले तेव्हाही मी व्यक्त झाले होते. तसेच खडसे यांना तिकिट मिळाले नाही याचेही मला वाईट वाटले होते. पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे तो निर्णय पक्षाला घ्यावा लागला असेल, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. खडसे यांच्याबाबत जे काही घडले त्याला मी न्याय की अन्याय या तराजूत तोलणार नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला डावलले जात असेल तर त्या व्यक्तीने किती सहनशक्ती ठेवायची याला मर्यादा असू शकतात” असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.

“मी अस्वस्थ होते, मात्र आता मला स्वतःला आजमावून पाहायचे आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा शून्यावर यायचे ठरवले आहे. पंकजा मुंडे यांचे कर्तृत्त्व काय ? असा प्रश्न विचारला जातो. आता हाच प्रश्न मला पुन्हा एकदा स्वतःला विचारायचा आहे. त्यामुळेच मी कोअर कमिटीची सदस्य हे जे एकमेव पद होते, त्याचाही राजीनामा दिला आहे” असेही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटले.

Protected Content