चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अडावद येथील अल्पभूधारक शेतकरी नवल ताराचंद महाजन (५४) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
नवल महाजन हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीसाठी त्यांनी अडावद विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. यावर्षी त्यांनी मक्याची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शेतातच सडले. त्यामुळे शेतातून खराब मका बाहेर काढण्याचा अतिरिक्त खर्च त्यांच्या माथी पडला.
पुढे त्यांनी उसनवारी करून रब्बी हंगामासाठी कांदा लागवड केली. शेवटचे पाणी भरल्यानंतर कांद्याच्या चांगल्या दराची आशा होती. मात्र, कांद्याच्या गडगडलेल्या किमतींमुळे त्यांचे सोसायटीचे कर्ज आणि इतर उसनवारीचे पैसे फेडणे शक्य होणार नाही, याची जाणीव झाल्याने ते मानसिक तणावात होते. पुढील हंगाम आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. नवल महाजन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.