मेलबर्न वृत्तसंस्था । गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीने धुमसत आहे, या आगीत जळून लाखो प्राणी, पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. तर दुसरीकडे दुष्काळाचीही झळ सोसत असलेल्या ऑस्ट्रेलियावर १० हजार उंटांची हत्या करण्याची वेळ आली आहे. येत्या पाच दिवसांत हेलिकॉप्टरमधून शार्पशूटर उंटांच्या कळपांना ठार करणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. या मुळे लोकांना उंटांचा मोठा त्रास होऊ लागला होता. याची दखल घेत तेथील प्रशासनाने व्यावसायिक शुटर्सना या उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले. या व्यावसायिक शूटर्सनी हेलिकॉप्टर्समधून उंटाना गोळ्या घालून ठार केले. ऑस्ट्रेलियात प्राण्यांना वाचवण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. या मुळे उंटांना मारण्याचे वृत्त पसरताच प्राणी प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.