वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन यूएस दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील आधार बहुउद्देशिय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे. या बाबत समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून जिल्ह्यात सुमारे ३० समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, भारतासह जगात बालकांवर अन्याय मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतात तर बालकांच्या तस्करीचा गुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनेक ठिकाणी आजही बालविवाह होत असतात, बळजबरीने मुलींना कमी वयात लग्नाच्या मंडपात बसावे लागते. बालकांच्या अशा अनेक समस्या असतात. यातील बाल विवाह, बाल मजुरी व तस्करी, बाल लैंगिक शोषण अशा मुद्द्यांवर कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन यूएस दिल्ली ही संस्था काम करीत असते. त्या संस्थेचा एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील आधार संस्था राबवत आहे. या संस्थेने जिल्ह्यात सुमारे 30 समन्वयक नियुक्त केले असून त्यांचे काम सुरु झाले आहे.
समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून नंदुरबार येथील बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी समन्वयकांना मार्गदर्शन केले आहे. या कामास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन,मदत करण्याचे आश्वासन दिले असून जिल्ह्यात १ पोलीस निरीक्षक नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत तर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यास देखील या बाबत कळवण्यात आले आहे. ह्या प्रकल्पामुळे जिल्हयात बालकांवरील अन्यात अत्याचार नक्किच कमी होतील अशी खात्री अनेकांनी व्यक्त करून दाखवली आहे. दरम्यान जिल्हयात कुठेही बालविवाह , बालमजुर किंवा बाल तस्करी सारखा प्रकार दिसल्यास आधार संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.