प.वि.पाटील विद्यालयाचा स्नेहसंमेलनात जल्लोष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई एज्युकेशन सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव चा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्रमुख पाहुणे विजय पवार (प्र अधीक्षक शा. पो. आ.), जयश्रीताई महाजन (माजी महापौर जळगाव मनपा ) , डी टी पाटील (कोषाध्यक्ष केसीई एज्यू. सोसायटी) , गंगाराम फेगडे (केंद्रप्रमुख), माजी मुख्याध्यापिका इंद्रायणी चौधरी,रेखा पाटील, मुख्या. प्रणिता झांबरे, मुख्या.अर्चना नेमाडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रुपेश महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ” निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांचा संग्रह” या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चिराग भूषण पाटील , लोक्षदा रुपेश महाजन यांना आदर्श विद्यार्थी तर काव्या आनंद फेगडे हिला गुणवंत विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना, जय जय महाराष्ट्र माझा, शिव तांडव, लुंगी डांस, कोळीगीत, आदिवासी नृत्य, नटरंग, गोंधळ, पोवाडा, लावणी, देशभक्तीपर गीत अशा गीतांवर चिमुकल्यांनी आपल्या बहारदार नृत्याविष्काराचे प्रदर्शन केले. तर स्नेहसंमेलनाची सुरुवात होण्यापूर्वी उपशिक्षक योगेश भालेराव तसेच कावेरी सुरवाडकर यांनी आपल्या बहारदार गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे यांनी केले तर निवेदन गायत्री पवार, भावना पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content