जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावरला येथील बसस्थानकाजवळील किराणा दुकानाला चौघांनी पेट्रोल टाकून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलीस जामनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विकास नाना पाटील (वय-३१) रा. सावरला ता. जामनेर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपल्या उदरनिर्वाह करतो. १५ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गावातील मुकेश गजमल कोळी, अविनाश विश्वनाथ कोळी, प्रमोद नारायण पाटील आणि सागर भगवान पाटील सर्व रा. सावरला ता. जामनेर यांनी खोडसाळपणे विकास पाटील यांच्या किराणा दुकानावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या आगीत सुमारे ११ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जनार्दन सोनोने करीत आहे.