मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रायगडच्या समुद्र किनार्यावर आज एक बोट संशयास्पद अवस्थेत आढळून आली असून यात तीन एके-४७ रायफल्स मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या समुद्र किनार्याजवळ आढळून आलेल्या बोटीबाबत विधानसभेत माहिती दिली. ते म्हणाले की, आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बोटीचं नाव ’लेडी हान’ असं असून या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्सगन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान असून ही बोट मस्तकहून युरोपकडे जाणार होती.
२६ जून २०२२ रोजी सकाळी १० च्या सुमारास या बोटीचं इंजिन निकामी झालं. त्यानंतर यावरील खालाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर १३ वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानकडे सुपूर्द केले. पण समुद्र खवळलेला असल्यानं लेडी हान या बोटीला टोईंग करता आलं नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळं ही बोट भरकट भारतीय किनार्याला लागली.
फडणवीस पुढे म्हणाले की, या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.