नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आणि व्यासंगी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार तर, बाल साहित्याचे विपुल लेखन करणारे साहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या  लघुकथेला बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला.

 

साहित्य अकादमीने शुक्रवारी या पुरस्कारांची घोषणा केली. मराठीसह सहा भाषांसाठीचा युवा साहित्य पुरस्कार यथावकाश जाहीर केला जाईल, असे अकादमीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

फक्त नफ्यातोट्याच्या हिशेबात निव्वळ बाजारपेठीय जगण्याशी नाळ जोडून घेणाऱ्या मानवी आयुष्यात संवेदनशीलता, करुणा या मूल्यांचे महत्त्व तरी किती उरणार, याचा आगामी काळाचा अस्वस्थ करणारा वेध ‘उद्या’ या कादंबरीत मांडण्यात आला आहे. ‘आबाची गोष्ट’ या लघुकथेतून लेखकाने ग्रामीण जीवनातील मुलांचे भावविश्व अलगदपणे उलगडत नेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कारांच्या निवड समितीमध्ये मराठीसाठी वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि निशिकांत मिरजकर हे तिघे सदस्य होते तर, बाल साहित्य पुरस्कारासाठी चंद्रकांत पाटील, कौतिकराव ठाले-पाटील, कृष्णात खोत हे तिघे परीक्षक होते.

 

पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद वाटतो. गेल्या ३० वर्षापासून मुलांचे भावविश्वा लक्षात घेता जे लेख लिहिले, संस्कार कथा, बोधकथा, खान्देशी बोलीतून लिहिलेल्या कथांचा हा सन्मान आहे. खानदेशातील मुलांना हा पुरस्कार समर्पित करतो  असे  आबा गोविंदा महाजन म्हणाले

 

साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये इंग्रजीसाठी अरुंधती सुब्रह्मण्यम यांच्या ‘व्हेन गॉड इज ट्रॅव्हलर’, हिंदीसाठी अनामिका यांच्या ‘टोकरी में दिगन्त: देअर गाथा’ तर, उर्दूमध्ये ‘अमावस में ख्वाब’ या हुसैन उल हक यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. बाल साहित्यामध्ये हिंदीसाठी ‘संपूर्ण बाल कविता’साठी बालस्वरूप राही, इंग्रजीसाठी विनिता कोएलो यांच्या ’डेड इज ए डोडो’ या कथेला व उर्दूसाठी हाफिज कर्नाटकी यांच्या’फख्र-ए-वतन’ या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला आहे.

Protected Content