तरूणाच्या घरातून २ लाख किंमतीचे तीन मोबाईलची चोरी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नशेमन कॉलनीतील तरूणाच्या घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून २ लाख रूपये किंमतीचे महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी १८ मे रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १९ मे रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तन्वीर मजहर पटेल (वय ३६, रा.नशेमन कॉलनी, जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ मे रोजीच्या मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान पटेल कुटुंबिय हे घरात झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या बेडरूममधून घरात प्रवेश करत घरातून २ लाख रूपये किंमतीचे तीन महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी तन्वीर पटेल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.