Home क्राईम किरकोळ वादातून कुटूंबातील तिघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

किरकोळ वादातून कुटूंबातील तिघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा येथे उखडा उचलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तीन भावंडांना लाकडी काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा जोरसिंग राठोड (वय २८, रा. करगाव तांडा ) आणि त्यांचे भाऊ समाधान व मलखान हे २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आपल्या जुन्या घरासमोरील अंगणात होते. यावेळी संशयित आरोपी रमेश भावलाल राठोड यांनी कृष्ण राठोड यांना ‘तुमचा उखडा येथून उचलून घ्या’ असे सांगितले. त्यावर फिर्यादीने ‘हा उखडा आमचा असून तो आमच्या जागेत आहे, आम्ही तो उचलणार नाही’ असे उत्तर दिले. या उत्तराचा राग आल्याने संशयित आरोपींनी शिवीगाळ करत कृष्णा राठोड व त्यांच्या भावांवर हल्ला केला.

या मारहाणीत संशयित आरोपी सोमनाथ भावलाल राठोड याने बाजूला पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली. संशयित रमेश भावलाल राठोड आणि पिनु भावलाल राठोड यांनी फिर्यादीचे मोठे भाऊ मलखान यांच्या पाठीवर आणि डोक्यावर काठीने प्रहार केले. तसेच, रविंद्र विष्णू राठोड याने आपल्या हातातील गोफणीने दगड फेकून मारला, जो फिर्यादीच्या उजव्या डोळ्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ‘आमच्या नादी लागलात तर तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी रमेश भावलाल राठोड, रविंद्र विष्णू राठोड, सोमनाथ भावलाल राठोड आणि पिनु भावलाल राठोड (सर्व रा. करगाव तांडा नं. ०२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विजय शिंदे करत आहेत.


Protected Content

Play sound