नागपुरात एका रात्रीत तीन खून झाल्याने खळबळ

download 1 3

नागपूर, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नागपूर शहरात काल (दि.२१) रात्री विविध भागात तीन हत्त्या झाल्या. यातील एक घटना ही संध्याकाळी वर्दळीच्या रस्त्यावर झाली तर अन्य एका घटनेत एका व्यावसायिकाला रस्त्यात अडवून त्याच्या कारमधून बाहेर काढून त्याची हत्या करण्यात आली. तिसऱ्या घटनेत एका मजुराची हत्या करून त्याचा मृतदेह मोकळ्या जागेत फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान तीन पैकी दोन घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

यातील पहिली घटना बुधवारी रात्री ७.३० च्या सुमारास नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या हसनबाग रोडवर घडली. हा रस्ता वर्दळीचा असून येथे विविध दुकाने आहेत. या प्रकरणातील फिर्यादी मोहम्मद आसिफ शेख यांचाही येथे भाजीचा व्यवसाय आहे. या प्रकरणातील आरोपी अतुल शेंडे (वय ४५) आणि अक्षय करोते (वय २६) हे शेख यांच्या ठेल्यावर मद्यधुंद अवस्थेत आले. या दोघांनी शेख यांच्या ठेल्यावरुन भाजी खरेदी केली. आले, मिरची आणि कोथिंबीर अशा तीन वस्तू शेख यांच्या ठेल्यावरून घेतल्या आणि गाडीच्या डिक्कीत टाकून हे दोघेही तेथून निघत होते. यावेळी शेख यांनी त्यांना हटकले आणि भाजीचे पैसे मागितले. मात्र अतुल आणि अक्षय यांनी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. यानंतर दोघांनी शेख यांना मारहाण सुरू केली. या दोघांनी शेख यांच्या मांडीत चाकू मारला. हा प्रकार शेखचा मित्र सय्यद इमरान सय्यद नियाद (वय २२) याने‌ बघितला. इमरान हा शेख यांच्या मदतीला धावला. दोन्ही आरोपींनी इमरानलाही मारहाण सुरू केली आणि त्याच्या चाकू त्याच्या छातीत भोसकला. त्यांनी इमरानच्या छातीवर चाकुने सपासप वार केले. इमरान रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला. इमरानचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेख गंभीररित्या जखमी झाला आहे. यानंतर अतुल आणि अक्षय यांनी शेख यांच्या गल्ल्यातील एक हजार रुपये लुटले आणि तेथून फरार झाले. नंदनवन पोलिसांनी काही तासांच्या आतच अतुल आणि अक्षय यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या ३०२, ३२६ आणि विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मजुराची हत्या :- शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह एका मोकळ्या जागेत फेकून देण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ११.०० च्या सुमारासउ घडकीस आली. विक्की विजय डहाके (वय २२) असे या प्रकरणातील मृतकाचे नाव आहे. तो हातमजुरी करीत असे. त्याला दारुचे व्यसन होते. एका प्राणघातक हल्ल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची हत्या करून त्याचा मृतदेह मोकळ्या जागेत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अनोळखी असून पोलीस कसून त्याचा तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या?:- शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक ऋषी खोसला (वय ४७) यांची बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हत्त्या करण्यात आली. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडवाना चौक ते नेल्सन चौक रस्त्यावरील सदोदय लक्ष्मी अपार्टमेंन्ट समोर घडली. ऋषी त्यांच्या गाडीने या रस्त्यावरून जात असताना काही जणांनी त्याला अडवले आणि त्याला कारमधून बाहेर काढून तीक्ष्ण शस्त्रांनी त्यांच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ऋषी यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी युथ फोर्स या संघटनेचा प्रमुख मिकी बक्षी याला अटक केली आहे. मिकी बक्षी याला यापूर्वीसुद्धा एका प्रकरणी अटक करण्यात आली होती. पुढे न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. अनैतिक संबंधातून हा खून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Protected Content