गौताळा अभयारण्यातून गारगोटी खडक चोरणारे तिघे वनविभागाच्या ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी । गौताळा औट्रमघाट अभयारण्य वनपरीक्षेत्र चाळीसगाव मधील नियतक्षेत्र पाटणा कक्ष क्र.३०३ मध्ये गारगोटी मौल्यवान खडक उत्खनन करणारे आरोपींना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील ७७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिघांना दोन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गौताळा औट्रमघाट अभयारण्यात काही चोरटे पाटणा कक्ष ३०३ येथे गारगोटी मौल्यवान खडकाचे उत्खनन करून चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वन्यजीव विभागाचे विजय सातपुते विभागीय वन अधिकारी वन्यजीव औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली एस.पी.काळे सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव कन्नड़, एम.डी.चव्हाण वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव चाळीसगाव,  डि.एस.जाधव वनपाल पाटणा,  अजय महिरे वनरक्षक बोढरा, उपालवाड वनरक्षक, एन.एस.देसले वनरक्षक पाटणा,  राजाराम चव्हाण, गोरख चव्हाण,नाना पवार, शुभम राठोड, लालचंद चव्हाण यांनी सापळा रचून कक्ष क्र.303 मध्ये गारगोठी मौल्यवान खडक उत्खनन करणारे सुकदेव गुलाब पवार (वय-४८), भगवान बबन शेलार (वय-४९ ) दोघे रा. पाटणा ता. चाळीसगाव, शेख राजीक शेख नाजीर (वय-४८) रा. शिवना ता. सिल्लोड जि औरंगाबाद यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील ११ किलो मौल्यवान खडकासह ७७ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केली होती आरोपींना १८ रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची वन कोठडी दिली आहे. पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी वन्यजीव एम.डी.चव्हाण करीत आहे. 

Protected Content