
जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलिसांनी गुरे चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी हस्तगत केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या तपासातून चोरीस गेलेली बैलजोडी सुनसगाव येथे मिळून आली असून, बैलजोडीसह चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुरे चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पहूर पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या दरम्यान पिंपळगाव गोलाईत शिवारातील शेत गट क्रमांक १०७ मधून फिर्यादी यांच्या मालकीची दोन बैलांची जोडी चोरीस गेली होती. मावळी जातीचे, पांढऱ्या रंगाचे, सरळ व लांब शिंगे असलेले आणि अंदाजे सात ते आठ वर्षे वयाचे हे दोन्ही बैल होते. त्यांची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इराद्याने बैल चोरून नेल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांना गुन्ह्याचा तपास करून तो उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रविण दातरे यांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून तपास पथक कार्यरत केले. चोरीस गेलेल्या बैलजोडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती दिली.
तपासादरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील, दोघेही रा. सोनाळा, ता. जामनेर, जि. जळगाव यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपले साथीदार दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने सदर बैलजोडी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली बैलजोडी सुनसगाव येथील पिंटू नावाच्या व्यापाऱ्याला विकल्याची माहितीही चौकशीतून समोर आली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते आणि त्यांच्या पथकाने सुनसगाव येथे जाऊन तपास केला. यावेळी चोरीस गेलेली बैलजोडी पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे, रा. सुनसगाव, ता. जामनेर यांच्या शेतात आढळून आली. पोलिसांनी ही बैलजोडी हस्तगत करून मूळ मालकाच्या ताब्यात दिली. तसेच चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी मावळी जातीचे दोन पांढरे बैल, ज्यांची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे, तसेच मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारा निळ्या रंगाचा विनानंबरचा जुना टेम्पो, ज्याची अंदाजित किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे, असा एकूण २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीस गेलेली बैलजोडी पुन्हा मिळाल्याने संबंधित शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत सोनवणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.



