जामनेर येथे आनंदयात्री परिवारातर्फे तीन दिवसीय परिवर्तन महोत्सव

WhatsApp Image 2019 07 26 at 9.32.10 PM

जामनेर, प्रतिनिधी । येथील आनंदयात्री परिवार व जळगाव येथील परिवर्तन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथे तीन दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या परिवर्तन महोत्सवातून जामनेरकरांना कवितांसह नाटकांची पर्वणी लाभणार आहे. दरम्यान शुक्रवार ता.२६ रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आनंदयात्री परिवाराच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष शेख अनीस शेख बिसमिल्ला, नगरसेवक प्रा.शरद पाटील, महेंद्र बाविस्कर, जितेंद्र पाटील तर आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष अमोल सेठ, जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुधीर सोठे, सचिव सुहास चौधरी, खजीनदार डॉ.आशिष महाजन, विशाल कुलकर्णी आदी सहकारी उपस्थीत होते. जामनेर शहरातील सांस्कृतीक चळवळीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी समविचारी कलाप्रेमींनी एकत्र येऊन ‘आनंद यात्री’ परिवाराची स्थापना केली. गुढीपाडव्यानिमित्त ‘पाळवा पहाट’ या सुरेल कार्यक्रमाने सुरूवात केलेल्या आनंदयात्री परिवारातर्फे शुक्रवार, शनिवार व रविवार (ता.२ ते ४) अशा तीन दिवसीय परिवर्तन महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ता. २ रोजी ८०० वर्षांच्या कवितांचा प्रवास उलगडणारा सांगीतीक कार्यक्रम, शनिवार ता. ३ रोजी राज्यभर गाजलेल ‘नली’ हे एकपात्री नाटक तर रविवार ता. ४ रोजी दोन अंकी कौटूंबीक नाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा रोडवरील बोहरा मंगल कार्यालयात आयोजित महोत्सवातून जामनेरकर रसीकांना सांस्कृतीक मेजवानी मिळणार आहे.

Protected Content