पिक विम्याच्या खोटया पॉलीसी दाखवून शेतकऱ्यांची लुट : मनसेची तक्रार

यावल, प्रतिनिधी | तालुक्यात शासनाच्या शेतकरी विमा योजनेत खोटे पंचनामे करून बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी टोळी सक्रीय झाली आहे. त्यामुळे पात्र व गरजू शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असून या विषयाची चौकशी करून कारवाई करावी अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे .
 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या तक्रार नियेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील काही दलाल हे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा योजनेच्या नांवाखाली खरे व पात्र शेतकरी डावलून बोगस शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम करत आहेत. या योजनेअतर्गत काढण्यात येत असलेली पिक विमा योजनेची पॉलीसी स्वतःच्या नांवावर काढून घेत असल्याचे गंभीर प्रकारही घडत असून या गोंधळामुळे खरे व पात्र लाभार्थी हे पिक विम्या पासुन वंचीत राहावे लागत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी एका लिखित तक्रारीव्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार , शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी , विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे यांची स्वाक्षरी आहे .

Protected Content