अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माझ्यासाठी हा दिवस अतिशय भावनिक आहे. केवळ कारसेवकच नाही तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. अयोध्येत राम ललाच्या प्राणप्रतिष्ठापनेला झाली असून फडणवीसांनी कोराडी येथील जगदंबा महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, कोराडीच्या ऐतिहासिक मंदिरात प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी रामललाच्या आगमनाच्या निमित्ताने 6 हजार किलो शिऱ्याचा प्रसाद तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता जगातील सर्वात मोठी कढई तयार करण्यात आली असून तिला हनुमान कढई असे नाव देण्यात आले आहे. इथे प्रसाद तयार केल्यानंतर ही कढई अयोध्येला जाणार आहे आणि पुढील आठवड्यात तिथे प्रसाद तयार करण्याचा एक नवीन रेकॉर्ड केला जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझ्यासाठी हा दिवस अतिशय भावनिक आहे. ज्या क्षणाकरिता संघर्ष केला, विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो, गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवले तो क्षण आज याचि देही याचि डोळा बघायला मिळणे हा रामाचा आशिर्वादच आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यावेळी रामलला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे हा आमचा नारा होता. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी ढाँचा खाली आला आणि तिथेच मंदिर तयार झाले. त्यानंतर ‘रामलला हम आयेंगे, मंदिर भव्य बनायेंगे हा आमचा नारा होता. पण आम्हाला जाण्याची गरज पडली नाही. पंतप्रधान मोदींनी तिथे भव्य मंदिर बनवले आणि आज प्राणप्रतिष्ठा हेत आहे. केवळ कारसेवकच नाही तर शेकडो कोटी हिंदुंकरिता आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरु होत आहे.