भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंधरा बंगला परिसरात गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तिन संशयित आरोपींना बाजारपेठ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील पंधरा बंगला परिसरात जलाल शहा दर्गा जवळ २९ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास काही तरूणी गावठी बनावटीची पिस्तूल घेवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीसांना मिळाली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी संशयित आरोपींना पकडण्याच्य सुचना पथकाला दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी अफाक अख्तर पटेल (वय २५, रा.पटेल कॉलनी खडका रोड भुसावळ, अदनान शेख युनूस (वय २५, रा.आगाखान वाडा मटन मार्केट भुसावळ आणि वकील खान उर्फ गोल्डी शकील खान (वय ३० रा.न्यू दर्गा होलिया मज्जिद जवळ भुसावळ या तिघांन अटक केली. त्यांच्या ताब्यातील १५ हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल हस्तगत केली आहे. तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पो.कॉ. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.