प्रांताधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेले एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड यांच्यासह महसूल पथकावर उत्राण येथे गिरणा नदी पात्रात जीवघेणा हल्ला केला होता. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांना पाचोरा येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील तिघांना कासोदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाईसाठी एरंडोलचे प्रांताधिकारी मनोज गायकवाड व महसूल विभागाचे पथक एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदी पात्रात गेले असताना तेथे प्रांताधिकारी गायकवाड यांच्या अंगावर वाळूचे ट्रॅक्टर घालून तसेच दगडफेक करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांचा शोध सुरू असताना हे हल्लेखोर पाचोरा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, अक्रम शेख लक्ष्मण पाटील, महेश महाजन विजय पाटील, रणजीत पाटील, अश्विनी सावकारे यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

त्यानुसार हे पथक पाचोरा येथे पोहोचले व पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश राजेंद्र पाटील (वय-२६), अमोल अरुण चौधरी (वय-३२), दादाभाऊ महादेव गाडेकर (वय-३६) सर्व रा.पाचोरा यांना ताब्यात घेतले. तिघांनाही कासोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Protected Content