जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तणाव टाळण्याचा प्रयत्न न करता तोच ऊर्जा केंद्र बनवा, असे मौलिक मार्गदर्शन अर्हम विज्जा प्रणेते प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केले. ‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ या विशेष ध्यानसाधना कार्यक्रमात हजारो जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात प. पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्वतःच्या उणिवा स्वीकारणे हीच खरी ध्यानसाधना आहे. परंतु, आपण इतरांच्या त्रुटी शोधण्यात ऊर्जा वाया घालवतो. मन हेच शांतीचं केंद्रबिंदू आहे आणि त्याला शांत ठेवण्याची शक्ती ध्यानसाधनेत आहे.” ते पुढे म्हणाले, “टेन्शन फ्री होण्याचा विचार सोडा, त्याच तणावाला पॉवर हाऊस बनवा. मग बघा, तुमचे स्वचिंतन टेन्शन आणि डिप्रेशनला कसे दूर करते. आत्मनियंत्रण शिकल्यास आयुष्य अधिक समृद्ध होते.”
कार्यक्रमाची सुरुवात प. पू. तीर्थेशऋषीजी म.सा. यांच्या ‘पाना नहीं जीवन… करना है साधना…’ या भावस्पर्शी भजनाने झाली. त्यानंतर, उपस्थितांना अर्हम् धूनच्या लयीने ध्यानसाधना करण्याचा अनुभव देण्यात आला. सकल जैन श्री संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, सर्व रोटरी क्लब, सर्व लायन्स क्लब, भारत विकास परिषद, केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहकारी आणि जळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रास्ताविक नंदलाल गादिया यांनी केले, तर अर्हम विज्जा प्रकल्पाची सविस्तर माहिती किरण गांधी यांनी दिली. सूत्रसंचालन सपना छोरिया यांनी केले आणि त्यांनीच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदान व मांगलिक पठणाने झाला.