मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली, त्यात पंकजा मुंडे यांना वगळण्यात आले, हे फडणवीसांचे षड्यंत्र असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केली आहे.
जुन्या काळात भाजपा वाढवण्यासाठी ज्यांनी जिवापाड मेहनत घेतली, त्या गोपीनाथ मुडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांना यावेळी जाणीवपूर्वकपणे विधानपरिषद, राज्यसभेतून वगळले. हे सर्व षड्यंत्र विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आहे. पंकजा मुंडेच नव्हेतर विनोद तावडेंना देखील डावलले गेले आहे. त्यांच्याऐवजी भाजपाने महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, आणि प्रसाद लाड अशा पाच जणांची उमेदवारी जाहीर करताना मात्र पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक वगळले असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली.
मेटे आणि खोत यांच्यावर देखील उपहासात्मक टीका
या सोबतच विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना देखील वगळल्याचे दु:ख झाले असून त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागली आहे. मात्र अशा वाटेवर फडणवीस तुम्हाला मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती, कारण मेटे आणि सदाभाऊ सभागृहात नसले तर सभागृह अगदी रिकामे वाटणार आहे. त्यामुळे भावी काळात त्यांचे आयुष्यमान वाढो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे मिटकरी यांनी उपाहात्मक वक्तव्यही ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.