गाझीयाबाद वृत्तसंस्था । येथे आयोजित करण्यात आलेल्या शहीद राम प्रसाद बिस्मील स्मृती करंडक स्पर्धेत स्वस्तीक चिकारा या अवघ्या १६ वर्षाच्या खेळाडूने तब्बल ६८५ धावा फटकावत क्लब क्रिकेटमध्ये नवीन विश्वविक्रमाची नोंद केली आहे.
गाझीयाबाद येथील दिवान क्रिकेट ग्राऊंडवर शहीद राम प्रसाद बिस्मील स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. याच्या अंतर्गत शुक्रवारी माही क्रिकेट क्लब आणि गोरखपूर येथील एसीई क्रिकेट अकॅडमीमध्ये सामना झाला. यात नवीन विश्वविक्रम प्रस्थापीत झाला. एसीई अकादमीनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. माही अकादमीच्या संघाकडून सलामीवीर म्हणून आलेल्या स्वास्तिक चिकारा या युवा फलंदाजाने पहिल्यापासूनच जोरदार टोलेबाजी सुरू केली. त्याने प्रीत या आपल्या सहकार्यासोबत पहिल्या गड्यासाठी तब्बल ५२७ धावांची भागीदारी केली. त्यात प्रीतच्या ४८ धावांचा समावेश होता. तर, स्वास्तिकने जोरदार फटकेबाजी करून १६७ चेंडूंवर ५८५ धावा काढल्या. त्यात ५५ चौकार आणि ५२ षटकारांचा समावेश होता. या विक्रमी धावसंख्येमुळं माही अकादमीच्या संघानं ३८.२ षटकांत ७०२ धावांचा डोंगर रचला. अर्थात, एसीई संघाला ही धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी त्यांचा ३५५ धावांनी पराभव झाला.
स्वास्तिक चिकारा हा फक्त १६ वर्षे वयाचा प्रतिभावंत फलंदाज असून एसीईविरुद्ध त्यानं केलेल्या ५८५ धावा हा क्लब क्रिकेटच्या इतिहासातील नवा विक्रम आहे. या आधी क्लब क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या शेन डेड्सवेलच्या नावावर होता. त्यानं २०१७ मध्ये ४९० धावा बनवून विक्रम केला होता. स्वास्तिक चिकाराने हा विक्रम मोडीत काढून आपल्या नावाने नवीन विक्रमाची नोंद केली आहे.